समृध्दी महामार्ग तयारही झाला नाही तरी नाव देण्याची घाई, आता राजमाता जिजाऊंच्या नावाचा आग्रह

Foto


औरंगाबाद- मराठवाडा, विदर्भ व कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणार्‍या मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम अद्याप सुरूही झाले नसताना त्याच्या नामकरणावरून राजकारण सुरू झाले आहे. या महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची तयारी भाजपने आधीच सुरू केली असताना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या महामार्गाला देण्याची मागणी शिवसेनेने केल्याने भाजप-सेना युतीत तणाव निर्माण झाला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने या महामार्गाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात या महामार्गाच्या नामकरणाचा वाद अधिकच पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

राज्याची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर या दोन शहरांतील ७१० किलोमीटरचा प्रवास अवघ्या सहा तासांवर आणणारा ‘समृद्धी द्रुतगती महामार्ग’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला ५६ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित होता;पण आता तो 56 हजार कोटींवर पोहोचला आहे. तब्बल १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा व नागपूर या १० जिल्ह्यांतील २७  तालुक्यांतील ३५० गावांतून जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प साकारला जात असून, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार हे भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मध्यंतरी बरेच चर्चेत होते. शासनाकडून कमी मोबदला दिला जात असल्याने भूसंपादनास शेतकर्‍यांनी विरोध केल्याने सुरुवातीपासूनच हा प्रकल्प वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. शेतकर्‍यांनी जमीन देण्यास तीव्र विरोध करून सरकारच्या विरोधात आंदोलने केली. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना शेतकर्‍यांच्या बाजूने मैदानात उतरली होती. अजूनही विरोधामुळे काही ठिकाणी भूसंपादनाचे काम रखडले आहे. आता या महामार्गाच्या नामकरण वादावरून मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. 

 

केंद्रात व राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेना भागीदार आहे;पण शेतकर्‍यांची कर्जमाफी, नोटाबंदी, अयोध्येत राम मंदिर उभारणी आदी मुद्द्यांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजप सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याची जुनीच मागणी पुन्हा करून शिवसेनेने फडणवीस सरकारला कोंडीत पकडले असताना आता समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करून पुन्हा कुरघोडी केली आहे. मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची तयारी फडणवीस सरकारने अगोदरच केली आहे. मात्र, अटलजींबद्दल आम्हालाही प्रेम असून देशातील अन्य प्रकल्पांना त्यांचे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान कराच; पण देशातील पहिल्यावहिल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढ रोवणारे बाळासाहेब ठाकरे यांचे योगदानही मोठे असून त्यांचेच नाव समृद्धी महामार्गाला देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे व शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस नाराज झाल्याचे समजते. आपण एकत्र काम करीत आहोत. या मार्गाला अटलजींचे नाव देण्याची घोषणा आपण यापूर्वीच केली आहे. अशा वेळी नको तो वाद कशाला निर्माण करता? अशा प्रकारे दबावाचे राजकारण खेळू नका, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना नेत्यांना सुनावल्याचे कळते. दरम्यान, माजी महाधिवक्‍ता श्रीहरी अणे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास कडाडून विरोध केला आहे. समृद्धी महामार्गापेक्षा पुण्यातल्या सदाशिव पेठेला ‘ठाकरे पेठ’ असे नाव द्या, असा खोचक सल्‍लाही अणे यांनी दिला आहे. समृद्धी महामार्गासाठी देशातील बँकांनी 9.5 टक्के व्याजदराने महागडे व प्रकल्प खर्चापेक्षा कमी कर्ज दिल्याने स्वस्त व आणखी कर्जासाठी रस्ते विकास महामंडळाने एशियन डेव्हलपमेट अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट बँकेकडे स्वस्त व्याजदराच्या कर्जासाठी धाव घेतली आहे. स्वस्त व पुरेसे कर्ज न मिळाल्यास प्रकल्प खर्चाचा भार राज्य सरकारवर येण्याची शक्यता आहे. आता समृद्धी महामार्गाचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीत भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

 

 

समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या -अभिजीत देशमुख  

 

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग वेरूळ,सिंदखेडराजा म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचे सासर आणि माहेरावरून जात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचेच नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंदखेडराजाचे राजे लखोजीराव जाधव यांची कन्या राजमाता जिजाऊ यांचा विवाह वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला होता. या दोघांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती संभाजी महाराजांनी एकही लढाई न हरता रयत व स्वराज्याचे संरक्षण व संवर्धन केले. राजे शहाजी, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय आणि संभाजीराजांची शिकवण आंतरराष्ट्रीय पातळीवर आत्मसात केली जात आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई प्रांतात राजमाता जिजाऊ यांचे कर्तृत्व सर्वांना परिचित आहे. हा महामार्गदेखील सर्व प्रांतांची नाळ घट्ट करणारा ठेरणार आहे. ज्या गौरवशाली इतिहासाचा महाराष्ट्राला व देशाला सार्थ अभिमान वाटतो, त्या परंपरेचे स्मरण यानिमित्ताने सदैव होत राहील. समृद्धी महामार्ग योगायोगाने याच ऐतिहासिक व पावनभूमीतून जात असल्याने समृद्धीऐवजी राजमाता जिजाऊ यांचे नाव दिल्यास यामुळे खर्‍या अर्थाने महामार्गाला भूषण प्राप्‍त होईल. देश-विदेशातून येणारे पर्यटक, उद्योजक, व्यावसायिकांना राजमाता जिजाऊंचा इतिहास, पराक्रमाची ओळख होईल, यातून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढेल, असे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.